शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्सची टंचाई भासत आहे. यापूर्वी ऑक्सिजन बेड मिळत नव्हते आता बेड आहेत; परंतु ऑक्सिजन मात्र नाही, अशी स्पष्ट कल्पना अगोदरच दिली जाते. खरे तर दोन्ही विषय महापालिकेच्या अखत्यारीतले नसले तरी रुग्णालयांना कोविड बेडसाठी महापालिकाच परवानगी देत असल्याने आता नव्याने कोविड रुग्णालये सुरू करणाऱ्या अशाप्रकारच्या ऑक्सिजन बेडसाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
इन्फो..
मनपाकडे केवळ पाचशे इंजेक्शन शिल्लक
महापालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आहे. परंतु त्याचबरोबर रेमडेसिविर मात्र आता केवळ पाचशेच शिल्लक आहेत. महापालिकेने दहा हजार इंजेक्शन्सची मागणी नोंदवली असून, त्यासाठी रक्कमही भरली आहे. ठेकेदार टप्प्याटप्प्याने ते पाठवणार असून, त्यात चार हजार ५०० इंजेक्शन आले होते. त्यातील आता फक्त पाचशे इंजेक्शन्स शिल्लक आहेत. कंपनीने वेळापत्रकाप्रमाणे औषधांचा पुरवठा यापूर्वीही केलेला नसून आता साठा न आल्यास महापालिका रुग्णालयांची अवस्थादेखील बिकट होणार आहे.