नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात ९ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित सर्व शासकीय रुग्णालयांतदेखील ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करावी, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून गेल्या आठवड्यातच पहिल्या टप्प्यातील ९ रुग्णालयांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लाख रुपयांच्या या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा रुग्णालयासोबत मनमाड, येवला, कळवण व चांदवड या उपजिल्हा रुग्णालयात तर सिन्नर,पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात हे प्लांट कार्यान्वित होणार आहे. तर केंद्र सरकारकडून नांदगाव, दाभाडी, पेठ, सुरगाणा या चार ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर येथे ऑक्सिजन प्लांट निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित अभोणा, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, हरसूल, गिरणारे, निफाड, लासलगाव, नगरसुल, उमराने, देवळा, सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे तर मालेगाव मधील महिला रुग्णालय व जनरल हॉस्पिटलमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यात येणार आहे. हे ऑक्सिजन प्लांट भविष्यात गरजू रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून भविष्यात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
इन्फो
केंद्र शासनाकडून ४ प्रकल्प
केंद्र सरकारकडून ४ ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआरमधून २ ठिकाणी प्लांट बसविले जाणार आहेत. त्यानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित १६ रुग्णालयांत देखील लवकरच स्वतःचा ऑक्सिजन प्लांट निर्माण होऊन जिल्ह्यातील सर्व ३१ शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.