नाशिक : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील उद्योगांना गेल्या सोमवारपासून ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला असून सात मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाच्या प्रभाावात उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा मर्यादित करण्यात आला होता. अनलॉकनंतर उद्योगांना आता पुन्हा पुरवठा सुरू झाल्याने उद्योगाचे चक्र गतिमान झाले आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमणाच्या काळात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या चाळीस हजारांवर गेल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. १३५ मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची आवश्यकता असताना राज्यासाठी केवळ ८५ मेट्रिक टन साठा मंजूर करण्यात आला होता. इतर जिल्ह्यांकडून ऑक्सिजन मागवूनही हा पुरवठा १०३ मेट्रिक टनांपर्यंतच पोहोचला होता. त्यामुळे उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा मर्यादित करून वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजन राखून ठेवण्यात आला होता.
कोरोनाची दुसरी लाट नाशिककरांसाठी भयावह ठरल्याने या काळात मोठी हानी झाली. ऑक्सिजनअभावी रुग्णालयांमध्ये बेडस्देखील उपलब्ध नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे जास्तीत जास्त प्राधान्य वैद्यकीय कारणांसाठी ऑक्सिजन वापर सुरू करण्यात आला होता. सुमारे महिनाभर मोठी अडचण निर्माण झाल्यानंतर आता कुठे दिलासा मिळासा मिळाला असल्याने शासनाच्या निर्देशांनुसार औद्योगिक वसाहतीस २० टक्के ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सोमवार(दि.७)पासून जिल्ह्यातील उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात झाली असून सद्य:स्थितीत ७ मेट्रिक टन इतका कोटा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यास सध्या ४५ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून वीस टक्केनुसार ९ मेट्रिक टन ऑक्सिजन कोटा उद्योगांसाठी आहे. मात्र सध्या उद्योगांसाठी सात मेट्रिक टनांची गरज पूर्ण केली जात आहे.