२० कुटुंबीयांना २० हजारांची मदत
नाशिक : सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ वंचित घटकांना दिला जातो. त्याअनुषंगाने यावर्षी अनेक लाभार्थींना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते. यावर्षी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी २० पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार याप्रमाणे सुमारे ४ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धनादेशवाटप करण्यात आले.
एस.टी. महामंडळाच्या भंगार गाड्यांचा आज लिलाव
नाशिक : नाशिक विभागीय एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत महामंडळाच्या भंगार झालेल्या गाड्या तसेच गाड्यांच्या लोखंडी, ॲल्युमिनियम साहित्यांचा लिलाव होणार असून या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कालबाह्य झालेल्या एस.टी. मिनीबसेस, लोखंड, ॲल्युमिनियम पत्रे, पाटे, रबरटस्ट, पॉवर स्टेअरिंग, लोखंडी ब्रास, आदी साहित्य लिलावातून विक्री केले जाणार आहे. लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावातून एस.टी.ला सहा कोटींपेक्षा अधिक कमाई झाली होती.
सहा हजार शिवभोजन थाळ्यांचे वितरण
नाशिक : कोरोनाच्या काळात गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळ्यांचा लाभ होत असून जिल्ह्यात दररोज ६५०० शिवभोजन थाळ्यांचे वितरण केले जाते. शहरात दिवसाला शहरातील केंद्रासाठी ३,७०० तर ग्रामीण भागात असलेल्या केंद्रांसाठी ३,३०० इतक्या थाळ्यांचे वितरण केेले जात आहे. कोराेनाच्या काळात थाळ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली असून त्याचा लाभ सर्वसामान्य गरीब नागरिकांना होत आहे. १५ जुलैपर्यंत नागरिकांना मोफत थाळी योजनेचा लाभ होणार आहे. मागील दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात थाळ्यांचे वाटप करण्यात आले.