गेल्या वर्षी कोरोनाने सिन्नर तालुक्यात प्रवेश केल्यावर केवळ सिन्नर ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी उपलब्ध होते. त्यानंतर शासनाने इंडिया बुल्स कोविड सेंटरची निर्मिती केली. वर्षभरात सुमारे ९ खासगी कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. शासकीय रुग्णालये मिळून ११ कोविड रुग्णालये असताना सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या फुल्ल झाली आहे.
सिन्नर तालुक्यात आतापर्यंत ८ हजार ९६२ कोरोनाबाधित झाले असून ७३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयात सुमारे २०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सुमारे बाराशे रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे. सिन्नर तालुक्यात शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची आतापर्यंत टंचाई जाणवली नाही. ऑक्सिजन मुबलक असला तरी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याला फारसा त्रास नसल्यास त्याच्यावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार केले जातात. मात्र रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्याची व्यवस्था आहे. सध्या सिन्नर ग्रामीण रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. निर्मला गायकवाड-पवार, डॉ. लहू पाटील, नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
इन्फो
या गावांत आहेत दहापेक्षा जास्त रुग्ण
सिन्नर शहरासह नायगाव, पांढुर्ली, मलढोण, डुबेरे, चास, पाटोळे, चिंचोली, वडगावपिंगळा, विंचूरदळवी, दोडी बुद्रूक, गुळवंच, गोंदे, माळेगाव, बारागावपिंप्री, दातली व मुसळगाव या गावांमध्ये १० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत. येथे आता जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यासह आरोग्य विभागाकडून या गावांमध्ये ४५ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. सुपरस्प्रेडर्सच्या रॅपिड टेस्ट करण्यावर जोर दिला जात आहे. किराणा व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते यांच्या रॅपिड टेस्ट घेऊन आणखी ग्रामस्थ बाधित होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.
फोटो - २२ सिन्नर कोरोना
सिन्नर ग्रामीण रुग्णालयाबाहेर रुग्ण व नातेवाईक.
===Photopath===
220421\22nsk_23_22042021_13.jpg
===Caption===
फोटो - २२ सिन्नर कोरोना सिन्नर ग्रामीण रुग्णालयाबाहेर रुग्ण व नातेवाईक.