नाशिक : जिल्ह्यात ऑक्सिजनच्या पुरवठ्यात गत दोन दिवसांपासून काहीशी वाढ झाल्याने खासगी आणि शासकीय कोविड हॉस्पिटल्सना काहीसा दिलासा मिळण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू झाली आहे. मात्र, या पुरवठ्यात सातत्य राहिल्यासच ऑक्सिजनच्या सातत्याबाबत काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना दररोज १२५ मेट्रिक टनहून अधिक ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र, दररोज होणारा प्रत्यक्ष पुरवठा हा ८५ ते १०० मेट्रिक टन इतकाच आहे. त्यामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवण्याच्या घटना घडत होत्या. काही रुग्णालयांनी तर ऑक्सिजनच्या सातत्यपूर्ण पुरवठ्याचा अभाव असल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेण्यासच नकार देण्यास सुरुवात केली होती. तर, गत आठवड्यात काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. काही रुग्णालयांनी तर ऑक्सिजन केवळ काही तासांपुरताच शिल्लक असल्याने दाखल रुग्णांना अन्यत्र हलविण्याची विनंती रुग्णांच्या नातेवाइकांना केली. त्यामुळे रुग्णालयांच्या प्रशासनाचे आणि संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये अनेक वाददेखील झाले. मात्र, जे दाखल आहेत, त्यांनाच कसाबसा ऑक्सिजन पुरवण्याची स्थिती गत आठवडाभर कायम होती. त्या तुलनेत गत दोन-तीन दिवसांपासून सुमारे १०० टनहून अधिक ऑक्सिजन नाशिकपर्यंत पोहोचत असल्याने ऑक्सिजनची तूट काही प्रमाणात तरी कमी होऊ लागल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. बुधवारी १०५ टन तर शुक्रवारी ११५ टन ऑक्सिजनचा पुरवठा नाशिकच्या ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यात काही प्रमाणात तरी उपकारक ठरणार आहे.