ओझरटाऊनशिप : प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जात असून, त्यानिमित्त हिवतापविषयी जनजागृती केली जात आहे
. जून महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जात असून, या महिन्यात ओझर आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, आशाताई घरोघर जाऊन हिवतापविषयी जनजागृती करत आहेत. त्यामध्ये जलद ताप सर्वेक्षण करणे, पाण्यात गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाइपला जाळी लावणे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, पाण्याच्या टाकीवर झाकणे लावावी, खड्ड्यातील पाणी वाहते करणे त्याचबरोबर लहान मुलापासून मोठ्यांनी मास्कचा वापर करणे, गरज असेल तरच घराबाहेर पडणे, सतत हात स्वच्छ पाण्याने धुणे आदींबाबत जनजागृती केली जात आहे तसेच हात धुण्याच्या पद्धती घरोघर जाऊन शिकवण्याचे काम आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. मोहिमेत तालुका सुपरवायझर रवींद्र देवरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पल्लवी कुलकर्णी, आरोग्य सहायक अनिल राठी, भारती कदम, आरोग्य सेवक अविनाश घोडविनदे, विकास पीठे, कावेरी कदम, संगीता गाडे, सविता ढवळे, चैताली कावळे, चित्रा सुतार, मेघा वाघ, सुनीता मोटमल आदी सहभागी आहेत. आपल्या घरातील डास उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. अक्षय तारगे यांनी केले आहे.