नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळाच्या पार्टीत नेमके कोण अधिकारी आणि कोणकोणते ठेकेदार हजर होते याची माहिती घेण्यासाठी दिंडोरी तालुका पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३१ जानेवारीच्या दिवसभरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज मिळण्याची मागणी केल्याचे समजते. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावर कोपरा न कोपरा सीसीटीव्हीच्या नजरेखाली असताना या पार्टीचे फूटेज मात्र पोलिसांना मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस दुरावत चालली आहे. एका चर्चेनुसार विमानतळाचे हस्तांतर न झाल्याने विमानतळावर केवळ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले, मात्र सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे आता सांगण्यात येत असल्याचे कळते. त्यातही जानोरी येथील ग्रामस्थांनी त्यादिवशी सहभागी झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या शासकीय व निमशासकीय वाहनांचे क्रमांक व फोटो काढले असून, त्याची माहिती पोलीस ठाण्यात दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे दिंडोरी तालुका पोेलीस ठाण्यातील या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३१ जानेवारीच्या दिवसभरातील सीसीटीव्ही फूटेजमधील चित्रीकरणाची माहिती मागविली असून, अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत दिंडोरी तालुका पोलीस ठाण्याला सीसीटीव्ही फूटेजबाबत माहिती दिली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विमानतळाचे काम पूर्ण झालेले असल्याने आणि केवळ कागदोपत्री हस्तांतरणाची प्रक्रिया बाकी असल्याने विमानतळावर बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झालेली असण्याची शक्यता आहे. मात्र आता याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानतळाचे बांधकाम करणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी या सीसीटीव्ही फूटेजबाबत नेमकी काय माहिती देतात? यावरच पोलिसांचा पुढील तपासाची मदार अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांची मदार ‘सीसीटीव्ही’ फूटेजवर ओझर पार्टी, मागविली फूटेजची माहिती, विमानतळाची ‘नजर’बंदच?
By admin | Published: February 08, 2015 12:44 AM