नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळावरील साग्रसंगीत पार्टी प्रकरणी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारवाई सुरू झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चौघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असले, तरी या पार्टीची परवानगी देणारे व ज्यांच्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.३१ जानेवारी २०१५ रोजी रात्री नऊ ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत नाशिक विमानतळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोपासाठी या साग्रसंगीत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विमानतळाचे बांधकाम करणाऱ्या हर्ष कन्स्ट्रक्शनमार्फत विलास बिरारी यांनी या मद्यपार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाची व कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली होती. मुळातच राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असलेल्या विमानतळावर साग्रसंगीत पार्टीची परवानगी दिलीच कशी आणि अशी पार्टी आयोजित करता येऊ शकते काय याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येऊन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक स्वतंत्र चौकशी समिती नेमून या गंभीर घटनेचा तत्काळ अहवाल मागविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी व पोलीस विभागाकडून अहवाल सादर करण्यात आला होता, तसेच स्वतंत्र चौकशी समितीनेही नाशिकला येऊन चौकशी करीत अहवाल तयार करून तो मुख्यमंत्री कार्यालयास सादर केला होता. आता या सर्व अहवालांवरूनच कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात चौघांचे निलंबन झाले आहे; मात्र ज्यांच्यासाठी पार्टी आयोजित करण्यात आली ते सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांच्यासह पार्टीला परवानगी देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, तसेच दिंडोरी पोलिसांनी या पार्टीत सहभागी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकारी व बिल्डर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. (प्रतिनिधी)
ओझर पार्टी : अनेकांचे दणाणले धाबे
By admin | Published: February 19, 2015 12:08 AM