गेल्या वर्षी कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर कोरोना गेला असल्याचा समज करून घेत लोक बिनधास्त झाले व नियमांचे पालन न करताच सर्व व्यवहार सुरू झाले. त्याचाच परिणाम दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढला. कोरोनाबाधितांची संख्या प्रारंभीच दोन आकडी आली. त्यानंतर रोज सतत वाढ होत गेली. ओझर हॉटस्पॉट ठरू लागले. मार्च, एप्रिलमध्ये तर कोरोनाबाधित रुग्ण आढळणारी संख्या रोज ७० पासून १३६ पर्यंत होती. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ७५० वर पोहोचली. दरम्यान, ओझर नगर परिषदेने सर्वप्रथम ओझर गावात येणाऱ्या गडाख काॅर्नरकडून ओझर गावात प्रवेश करणारा मुख्य रस्ता व उपनगरातील सर्व रस्ते बंद केले. ओझर व्यापारी असोसिएशनने १५ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केले. कडक निर्बंध लावले गेले. परिणामी, त्याचे दृश्य परिणाम हळूहळू दिसू लागत रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत गेली. त्यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला असून, यापुढेही नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
ओझरची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:11 AM