नाशिकरोड : अवघ्या वीस दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, बाजारामध्ये छोट्या-मोठ्या गणरायाच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर कारखान्यांमध्ये गणपतीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवून मूर्ती तयार करीत आहे. अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या गणरायाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असून, सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. बाजारामध्ये खासगी गाळ्यांमध्ये घरगुती गणपती विक्रीसाठी दाखल होऊ लागले आहेत. मनपाकडून गणपती मूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही. राज्य शासनाने प्लॅस्टिक, थर्माकोल यावर बंदी टाकल्याने अद्याप बाजारात आराससाठी वापरण्यात येणारे थर्माकोलचे मंदिर उपलब्ध झालेले नाही. यामुळे विक्रेते व भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. गणेशमूर्ती बनविण्याच्या कारखान्यांमध्ये छोट्या घरगुती मूर्ती जवळपास पूर्ण झाल्या असून, त्या विक्रेत्यांकडे पाठविण्यास सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात राहिलेल्या छोट्या आकाराच्या गणपती मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवून पूर्ण केल्यानंतर त्या मूर्ती राखी पौर्णिमेनंतर पुढील आठवड्यात बाजारात विक्रीसाठी दाखल होतील. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींचेदेखील निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून, लहान मूर्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम पूर्ण करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून एकसारखी पावसाची रिपरिप सुरू असून, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने रंग वाळण्यास वेळ लागत आहे. कच्च्या मालाला जीएसटीराज्य शासनाने श्री गणरायाच्या मूर्ती व राख्या यांना जीएसटीमधून वगळले आहे. मात्र गणपती बनविण्यासाठी प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंग आदी कच्च्या मालाला जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे कच्च्या मालाची किंमत वाढली असून कारागीरांची मजुरीदेखील वाढली आहे. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या किमतीतदेखील काही प्रमाणात वाढ झाली आहे.
गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:25 AM