मुंबई - स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. सध्या भाजपच्याविरोधात असलेली शिवसेनाही या मागणीसाठी आग्रही आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून या मागणीला नेहमीच विरोध होतो. विशेषत: काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने सावरकर यांचा माफीवीर म्हणून उल्लेख करतात. आपल्या भारत जोडो यात्रेतही त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपला टार्गेट केलं होतं. त्यावेळी, भाजपने राजकारण न करता सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी भूमिका शिवसेनं घेतली होती. आता, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सावरकरांना भारतरत्न मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं आहे.
'वीर सावरकर यांना भारतरत्न द्या, ढोंगी प्रेम दाखवू नका. आमची आधीपासून ही मागणी आहे. आताही तिच मागणी आहे, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा सावरकर यांच्यासोबत भारतरत्न दिला पाहिजे' असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला होता. केंद्रात भाजपचं सरकार असतानाही सावकरांबद्दल कोरडं प्रेम दाखवलं जात असल्याचं आरोपही शिवसेनेनं केला होता. आता, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करुन सावरकरांच्या जन्मभूमीला भेट दिल्याचं सांगितलं. तसेच, सावरकरांच्या कर्तृत्वावर शंका घेणाऱ्यांना या दैवी उर्जेचा अनुभव होणार नाही. त्यांची प्रेरणा राष्ट्रउभारणीच्या कार्यात सदैव स्मरणात रहावी यासाठी, सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
पडळकर यांनी येथील भेटीचा आणि सावकरांच्या जन्मस्थळाचा व्हिडिओही ट्विट केला आहे. दरम्यान, सावरकरांच्या मुद्दयावरुन नेहमीच राजकारण केले जाते, काँग्रेस नेते राहुल गांधी हे भाजपला याच मुद्द्यावरुन डिवचण्याचा प्रयत्न करतात. भाजकडूनही त्यास प्रत्युत्तर दिले जाते. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही.