दिंडोरी : कादवा कारखान्याने गाळप क्षमता वाढवली असून, त्यामुळे १०१ दिवसांतच दोन लाख क्विंटल साखर उत्पादित करणे शक्य झाले आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी सर्व ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याने १०१ दिवसांत दोन लाख क्विंटल साखर निर्मिती केली. त्यानिमित्त साखर पोतेपूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्रीराम शेटे बोलत होते. यावेळी माजी संचालक शिवाजी जाधव, अशोक वाघ, पुंडलिक पाटील, भिमाजी घुगे, बळवंत थेटे, बाळासाहेब बोरस्ते, उद्धव मोरे, संपत घडवजे, उद्धव कामाले, दिनकर देशमुख, भाऊसाहेब पाटील, हरिभाऊ पवार, कामगार संचालक सुनील कावळे यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी कादवाने आज पावेतो एफआरपी अदा केली आहे. यावर्षी जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे शेटे यांनी सांगितले. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, गणपतराव पाटील, दत्तात्रेय पाटील, संजय पडोळ, सदाशिव शेळके, सुनील कावळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले. यावेळी सर्व संचालक, ग्रामसमितीचे सदस्य, उसउत्पादक, सभासद कामगार उपस्थित होते.