सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात दोन दिवसांत २५३.१ मी.मी. पावसाची नोंद झाली असून, नदी-नाल्यांना महापूर आला आहे. अनेकांची भातशेती पाण्यात बुडाली आहे.टाकेद परिसरात सोमवारपासूनच पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात हाहाकार उडवून दिला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीत पाणी शिरले आहे. कडवा नदी, करंजी ओहळ , लेंडी नाला तुडुंब भरून वाहत होता. अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत होते. कडवा नदीवरील पुलाला पाणी लागण्यास पाचफूट अंतर असल्याने घोटी, इगतपुरीकडे जाणारी वाहतूक मंगळवारी दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने शाळा, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. अतिपावसामुळे कुणीही घराबाहेर पडण्यात धजावत नसल्याने अघोषित संचारबंदी असल्याचे जाणवत होते. अडसरे बुद्रूक येथे काही घरांची पडझड झाल्याची माहिती मंडल अधिकारी गीते यांनी दिली.या भागात ज्यांनी भातलागवड सुरू केली होती व ज्यांची शेती नदी, नाले, ओहळ यांच्या कडेला आहे त्यांनी लागवड केलेला भात वाहून जाण्याची भीती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत शेतात पाणी आहे तोपर्यंत किती नुकसान झाले आहे याचा अंदाज येणे कठीण आहे. मागील महिन्यात पडलेल्या पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांचे शिल्लक राहिलेले पंचनामे त्वरित् करण्याची मागणी सरपंच बाळासाहेब घोरपडे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे व पंचायत समिती सदस्य हरिदास लोहकरे यांनी केली आहे.(वार्ताहर)
इगतपुरीच्या पूर्व भागात भातशेती पाण्यात
By admin | Published: August 04, 2016 1:08 AM