पेठ -जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील भाताची शेती संकटात सापडली असून भात व नागलीची रोपे करपू लागली आहेत. शिवाय बियाणांची उगवण क्षमताही घटली आहे.पेठ तालुक्यात खरीप हंगामात भात व नागली ही दोनच पिके घेतली जातात. भात पिकाची साधारणपणे बियाणे पेरणी व लावणी अशा दोन टप्प्यात शेती केली जाते. यावर्षी निसर्ग वादळाच्या निमित्ताने झालेल्या पावसाचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी भात व नागलीची बियाणे पेरली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागात भाताची रोपे करपू लागली असून पुरेशा पाण्याअभावी रोपेही विरळ झाली आहेत. अजून काही दिवस अशाच प्रकारे पावसाने पाठ फिरवली तर आदिवासी शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.------------------------------------दुबार पेरणीला संधी नाहीएरवी पाऊस लांबल्याने वाया गेलेल्या पेरण्या दुबार केल्या जातात.बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन पिकांची दुबार पेरणी शक्य असते. मात्र भात व नागली या पिकांची दुबार पेरणी करण्याची संधी नसल्याने एकदा वाया गेलेले पिक पुन्हा पेरणी करून लावणी करणे शक्य नसल्याने शेतकर्यांचा खरीप हंगाम हातातून जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.जूलै महिन्यात बहुतांश शेतकर्यांची लावणी पुर्ण होत असतांना या वर्षी अजूनही भाताची खाचरे कोरडीच असल्याने वेळ असूनही शेतकर्यांना शेतीची कामे करता येत नाहीत.------------------------पेठ तालुक्यात जवळपास १०० टक्के भात व नागली बियाणे पेरणी झाली असून पाऊस लांबल्याने डोंगर उतारावर पेरणी केलेली रोपे पिवळी पडू लागली असून ज्या शेतकºयांना थोडीफार पाण्याची सोय आहे असे शेतकरी रोपे वाचवण्याची धडपड करत आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे.-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ------------------------------
पावसाअभावी भात शेती संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 1:16 PM