सर्वतीर्थ टाकेद : पावसाचे माहेर घर व भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात या वर्षी अजूनही दमदार पाऊसझालेला नाही. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात काही प्रमाणात हजेरी लावणाºया पावसाने इगतपुरीच्या पूर्व भागाकडे पुर्णत: पाठ फिरवली आहे.पूर्व भाग अद्यापही कोरडाठाक असल्याने भात उत्पादक शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या सावटाखाली आहे.दहा दिवसांपूर्वी मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाला होता. मुंबईत पाऊस सुरू झाला की, इगतपुरी तालुक्यात पाऊस येतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे.यंदा मुंबईत जोरदार पाऊस होत असतांना इगतपुरी तालुक्यात मात्र उदासीनताच आहे.तालुक्यात तुरळक स्वरूपात झालेला पाऊस इगतपुरी आणि घोटी परिसरापुरताच मर्यादित होता. घोटी-इगतपुरी वगळता पूर्वभागातील टाकेद, खेड,वासाळी, धामणगाव,परदेशवाडी, धामणी, पिंपळगाव मोर, अडसरे, भरविर, अधरवड, सोनोशी, मायदरा, बारशिंगवे आदी गावांसह वाड्या वस्त्यांमध्ये वीस दिवसांपासून अद्यापही पाऊस नसल्याने या भागातील शेतकरीवर्ग पूर्णपणे धास्तावला आहे. लागवडीसाठी पर्याय घोटी, इगतपुरीसह पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी तो भात शेतीसाठी तसेचइतर पिकांसाठी फारसा फायदेशीर नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहीर, शेततळे, बंधारा, ओहोळ, नदीच्या पाण्यावर भाताची लागवड करुन पर्याय शोधला आहे. परंतु पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकरी आजही भात शेतीला पूरक असलेल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसाने पाठ फिरविल्याने इगतपुरीत भात शेती संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 8:53 PM