नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात प्रमुख पीक असलेल्या भात पिकाची लागवड यावर्षी यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे. तालुक्यात हा पहिलाच प्रयोग होणार असून, पाडळी देशमुख येथील माजी सरपंच भीमराव गवारी यांनी हे यंत्र खरेदी केले असून, त्यासाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधे कृषी केंद्रात उपलब्ध झाली आहेत. या यंत्राची पाहणी तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी सहाय्यक एस. डी. चव्हाण, विनोद सांगळे आदींनी केली.कृषी विभागातर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान सन २०२० मध्ये मौजे पाडळी देशमुख येथील भीमा गवारी यांना ५० टक्के अनुदानावर आधुनिक भात लावणी यंत्र दिले असून, यावर्षी इगतपुरी तालुक्यात प्रथमच या यंत्राच्या साहाय्याने भात लागवड केली जाणार आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. इगतपुरी तालुक्यात रोहिणी नक्षत्राने जोरदार सलामी दिल्यानंतर यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आला आहे.---------------------यंत्राने भात लागवडीचे फायदेपारंपरिक पद्धतीपेक्षा ५० टक्के बियाणे कमी लागते. रोपांमध्ये मर कमी होते. लागवड खर्चामध्ये ५० ते ६० टक्के बचत होते. १ व्यक्ती १ दिवसात चार एकर भात लागवड करू शकतो, ट्रे पद्धतीने रोपे तयार केल्यामुळे पिकामध्ये रानभात भेसळ होत नाही. १६ दिवसात रोपे लागवडीसाठी येतात, रोपे तयार करताना पाणी व खतांची बचत होते, आपल्याला हव्या त्या अंतरावर भात लागवड करता येते.
इगतपुरीत मानवचलित यंत्राने भात लावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 9:57 PM