लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येथील खंबाळे येथे पार्किंग करून लोकांच्या गैरसोयीत भरच टाकण्याऐवजी पेगलवाडी येथील साधुग्रामच्या जागेत वाहनतळ केल्यास सर्वांनाच सोयीचे होईल, असे मत जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे. वाहनतळ नियोजनाबाबत समस्त त्र्यंबककरांनी कडवटपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष तृप्ती धारणे यांनी त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांसह जिल्हाधिकारी नाशिक यांना तहसीलदारांमार्फत एक निवेदन दिले आहे. त्र्यंबकेश्वर येथे पौष वद्य एकादशीला संत निवृत्तिनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते. दशमी, एकादशी (मुख्य यात्रा) व द्वादशी अशी तीन दिवस यात्रा भरते. या यात्रेला ५ ते ६ लाख भाविक यात्रेकरू येत असतात. त्या तुलनेत तिसºया श्रावणी सोमवारला गर्दी होत नाही. याशिवाय तिसºया श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर लोक शनिवार, रविवार व सोमवार अशी गर्दी करतात. म्हणजे तिसºया सोमवारची गर्दी विभागली जाते. खंबाळे येथे पार्किंग करण्यासंदर्भात प्रशासनातर्फे एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करून भाविकांसह स्थानिकांना अडचणीत टाकले आहे. त्र्यंबकेश्वरहून दररोज नोकरी-व्यवसायानिमित्ताने ये-जा करणारे, शाळा-कॉलेजात जाणारे, अचानक महत्त्वाच्या कामासाठी याशिवाय आजारी रुग्णास घेऊन जाणे-आणणे, तीन दिवस स्वतंत्र वाहनातून दैनिकांचे पार्सल आणणे आदींची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे, खंबाळे, पहिने, अंबोली व तळवाडे येथून बसने येणे यात्रेकरूंसाठी गैरसोयीचे ठरणार आहे. कारण यातील बरेच वृद्ध, भाविक, मुले आदी तसेच स्वत:ची आलिशान कार सोडून कधीही बसमधून प्रवास न केलेले भाविक वृद्ध असेही लोक श्रावणी सोमवारला येतात. यासाठी साधुग्रामचा वाहनतळ शहरापासून तीन कि.मी. दूर असला तरी सोयीचा ठरणार आहे. हे वाहनतळ खंबाळे वाहनतळाला सोयीचे ठरणारे वाहनतळ आहे. अन्य तळवाडे, पहिने व अंबोली हे वाहनतळदेखील ६/७ किलोमीटर अंतरावर आहेत. याशिवाय जव्हारफाटा बसस्थानक ते पोलीस स्टेशन मार्गे त्र्यंबक नगरपालिका कोपºयावरून तेली गल्ली मार्गे कुशावर्त तीर्थ येथून अंघोळ करून त्र्यंबकेश्वर मंदिरातून दर्शन करून प्रदक्षिणेला जाणे अथवा न जाणे हे भाविकांनी ठरवायचे आहे. तसेच गंगाद्वार, ब्रह्मगिरीला जाणारे असेही भाविक असतात. हा सर्व प्रवास भाविकांना पायीच करायचा आहे. त्यासाठीच शहराच्या व भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष तृप्ती धारणे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. येथे तिसºया श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या वाहतूक नियोजनात खासगी वाहनांना दि. ५ ते ८ आॅगस्टपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली असल्याने ते बदलण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष तृप्ती धारणे यांनी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार महेंद्र पवार यांच्या माध्यमातून शिष्टमंडळासह निवेदन दिले आहे. दरवर्षीप्रमाणे प्रदक्षिणेच्या आदल्या दिवशी पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.तिसºया सोमवारकरिता जिल्हा प्रशासनाने वाहनांना केलेली प्रवेशबंदी भाविकांसह नागरिकांची कोंडी करणारी ठरणारी आहे. या सोमवारी गर्दीचे नियोजन करण्यासाठी रविवारपासून सोमवार सायंकाळपर्यंत वाहनांना शहराकडे प्रवेशबंदी करणे रास्त आहे. तसेच श्रावणी सोमवारी प्रदक्षिणेस येणारे भाविक रविवारी रात्री ८ वाजेनंतर येतात आणि सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून परततात. मात्र प्रशासनाने सलग चार दिवस प्रवेशबंदी केल्यामुळे त्र्यंबककरांसह परिसरातील नागरिकांवर व भाविकांवर त्याचा परिणाम होणार असल्याने ती रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या काळात प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक यांना विनाकारण वेठीस धरले जाते. त्यामुळे हे नियोजन बदलावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी गटनेते रवींद्र सोनवणे, पुरुषोत्तम कडलग, पुरुषोत्तम लोहगावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पेगलवाडी येथील साधुग्रामच्या जागेत वाहनतळ केल्यास सोयीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:07 AM