घोटी : मुंबई, कोकणासह कसारा घाट व इगतपुरी तालुक्यात आभाळ फाटल्यागत पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिशय मुसळधार पावसामुळे कसारा घाटात चार दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळून रेल्वे व महामार्गावरील वाहतूकव्यवस्था ठप्प झाली होती. मध्यरात्रीच महामार्गारील दरड हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली. मात्र, कसाऱ्याहून नाशिककडे जाणाऱ्या मध्यरेल्वे मार्गावर ठिकठिकाणी दरड कोसळून मलबा व मोठे दगड रेल्वे रुळांवर आल्याने रेल्वेची दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या जव्हार फाट्याजवळील टीजीआर-१ जवळील १२५/४०० डाउन मार्गावर दरड कोसळली असून, त्याच्याच पुढे ओव्हरहेड वायरवर झाड पडले आहे, तसेच कथरुवंगण वाडी येथील टीजीआर-२ येथील १३१/३ मिडल लाइनवर मातीचा खच पडला आहे, तर मानस हॉटेलजवळील टीजीआर-१/ १३३/५३ अप लाइनच्या ट्रॅकखालील खडी वाहून गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायरवरचे झाड काढण्यात आले असून, जेसीबी ट्रॅकजवळ येण्यास अडचण येत असल्याकारणाने बाकी कामे करण्यास अडचणी येत होत्या.
-------------------------
वाहतुकीसाठी मार्ग खुला
महामार्गावरील जुना कसारा घाटातून दरड हटविण्याचे काम पहाटे ४ वाजता संपले असून, मुंबईहून नाशिकला जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या डाउन व मिडल लाइन कोसळलेल्या दरडी व माती हटविण्याचे काम सुरू आहे, तसेच अप लाइनखालील वाहून गेलेल्या खडीचे पुन्हा भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ, आरपीएफ व रेल्वे कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल असून, अजून मध्य रेल्वेची सेवा दुपारपर्यंत चालू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
-------------------------
लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
मध्य रेल्वेची दोन्ही मार्गांची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे गोरखपूर- हावडा, पवन एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात रद्द करण्यात आल्या असून, राज्यराणी, पंचवटी, सेवाग्राम एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्पेस या रद्द करण्यात आल्या आहेत. इगतपुरी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कल्याणला जाण्यासाठी नाशिक, इगतपुरी आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात आली. सकाळी १० वाजेपर्यंत इगतपुरीहून १८ बसेस कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आल्या असून, अजून ४० बसेस रेल्वे प्रशासनाने मागविल्या आहेत. मुंबईहून येणाऱ्या गाड्या वसई, विरारमार्गे वळविण्यात आल्या असून, भुसावळहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या जळगाव- मनमाडमार्गे वळविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
----------------------------------
बससेवाही विस्कळीत
इगतपुरी- कसारादरम्यान कसारा घाटात रेल्वे ट्रॅकवर ठिकठिकाणी दरड कोसळल्याने व ओव्हरहेडची वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या इगतपुरी येथेच थांबविल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. इगतपुरीहुन रेल्वेच्या प्रवाशांना कल्याणपर्यंत सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. इगतपुरी आगारातून अनेक बसेस कल्याणला पाठविल्याने इगतपुरी घोटी येथून नाशिक व अन्य काही ठिकाणच्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बससेवाही विस्कळीत झाल्याने अनेक बस प्रवाशांना याचा फटका बसला.
(२२ घोटी १/२/३)