नाशिक : येवला येथील नाकोड पैठणी दुकान फोडून पैठणींची चोरी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, या चोरी प्रकरणातील एका चोरट्याने चक्क सीसीटीव्ही कॅमे-यासमोर डान्स करत चोरीचा आनंद व्यक्त केला होता. या डान्सर पैठणीचोराची माध्यमांमधून जोरदार प्रसिद्धी झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. दरम्यान, पोलिसांनी या चोरट्यांकडून १ लाख ८० हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.येवल्यातील नाकोड पैठणी दुकानात दि. ६ मे २०१९ रोजी लाखोंच्या पैठण्यांची चोरी झाली होती. या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत तपास सुरू होता. पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून तपासाला गती दिली. सदर पैठणी चोर हे येवला रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची खबर प्राप्त झाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला असता संशयितांना त्याची चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढला परंतु, पोलिसांनी पाठलाग करत अमोल शांताराम शिंदे (२१), राजू बाळासाहेब गुंजाळ (२१) दोघेही रा. उंदिरवाडी ता. येवला तसेच सागर अरुण शिंदे (२५) रेल्वेस्टेशनजवळ, येवला आणि सागर बाळू घोडेराव (२६) रा. आडगाव चोथवा, ता. येवला यांना ताब्यात घेतले तर कलीम सलीम शेख रा. येवला आणि करण फुलारी रा. नाशिक हे फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ४८ पैठण्या, १२ घागरे, कटर मशिन, २ ड्रिल मशिन तसेच मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने कोणासही संशय येऊ नये म्हणून संशयितांनी येवला व सिन्नर तालुक्यात सामान्य लोकांना या पैठण्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले.डान्सर चोर उंदिरवाडीचापोलिसांनी ताब्यात घेतलेला डान्सर चोर राजू गुंजाळ हा उंदिरवाडी येथील असून सागर घोडेराव याने यापूर्वी नाकोड पैठणी दुकानात काम केले आहे. त्याने येवला विश्रामगृहात काम करणा-या कलीम शेखच्या साथीने प्लॅन रचून दुकान फोडले. या संशयितांविरुद्ध मनमाड रेल्वे पोलिसात चोरी व जबरी लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. राजू गुंजाळ या चोराने चोरीनंतर सीसीटीव्हीसमोर हातवारे करत डान्स केला होता. ‘पैठणीचा चोर नाचरा पहा’ अशी टॅगलाइन घेत त्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये झाली होती.
पैठणीचा नाचरा चोर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 4:28 PM
सीसीटीव्हीसमोर केला होता डान्स : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ठळक मुद्देया डान्सर पैठणीचोराची माध्यमांमधून जोरदार प्रसिद्धी झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा झाली होती.