नाशिक : पाकिस्तानची निर्मितीच विनाश बुद्धीतून झाली आहे. भारताच्या फाळणीपासूनच पाकिस्तानने विकासात्मक प्रगतीच्या दिशेने वाटचाल न करता विनाशकारी मानसिकतेतून सातत्याने भारतविरोधी कारवायांना प्राधान्य दिले. त्यामुळे पाकिस्तान स्वत:च प्रगतीपासून दूर राहिला असून, भारताच्याही प्रगतीच्या मार्गावर वारंवार अडचण निर्माण करण्याचा प्रयन्न त्याच्याकडून सुरू आहे. याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम संपूर्ण जगावर होत असून, पाकिस्तानची विनाश बुद्धी ही भारतासह संपूर्ण जगासाठी घातक असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय नाशिक व लेट्स टॉक यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.११) डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे लिखित ‘पाकिस्तान विनाशाकडून विनाशाकडे’ पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त ब्रिगेडियर जगदीशचंद्र बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्याख्यानात त्यांनी, भारत पाकिस्तानच्या फाळणीची पार्श्वभूमी आणि तत्कालीन सरकारच्या भूमिके वर प्रकाशझोत टाकताना तत्कालीन भारतीय नेत्यांनी कच खाल्ल्यामुळेच पाकिस्तानची फाळणी झाल्याचा आरोप यावेळी केला. तर डॉ. परीक्षित शेवडे यांनीही, पाकिस्तानात शाळेतूनच विनाशकारी शिक्षण दिले जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, फाळणीनंतर पाकिस्तानने वारंवार भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. यश मिळत नसल्याने आता त्यांनी भारताच्या विरोधात प्रॉक्सीवार सुरू केले असून, त्यातूनच भारतात दहशतवादी हल्ले होत आहेत. शालेय शिक्षणातूनच विनाशकारी शिकविण दिली जात असल्याने पाकिस्तानच्या पुढील पिढ्याही विनाशकारी विचार करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन, सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव धर्माजी बोडके, सहायक सचिव अॅड. अभिजित बगदे, वस्तुसंग्रहालयाचे उदयकुमार मुंगी उपस्थित होते.
पाकिस्तानी विनाशबुद्धी भारतासह जगासाठी घातक : शेवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:00 AM