नाशिक : मित्र म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातील हळवा कोपरा. मैत्रीचे हे बंध रक्ताच्या नात्याहूनही अधिक सरस आणि श्रेष्ठ ठरत आलेले आहेत. २५ वर्षांपूर्वी गोखले शिक्षण संस्थेच्या एचपीटी महाविद्यालयात पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी अर्थात मित्र-मैत्रिणींचा गोतावळा गेल्या रविवारी (दि.२९) एकत्र आला आणि प्रत्येकाच्या हळव्या कोपऱ्यातील आठवणींचा झरा पाझरता झाला. १९८८ ते १९९५ या कालावधीत गोखले शिक्षण संस्थेच्या एचपीटी महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम एकत्र आणले ते व्हॉट्स अॅपने. एचपीटी कॉलेज ग्रुप तयार झाल्यानंतर त्यामध्ये एकेका मित्र-मैत्रिणींची भर पडत गेली आणि तेथूनच एकत्र जमण्याची ओढही लागली. आपापल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असलेल्या प्रत्येकाच्या सोयीनुसार एकदाची तारीख निश्चित झाली आणि हॉटेल व्यवसायात नाव कमावलेल्या प्रसन्ना बोंडे या मित्राच्याच त्र्यंबकरोडवरील आनंद रिसॉर्टवर सर्वांसाठी रविवारचा दिवस सुखद आणि आनंददायी ठरला. एचपीटीच्या माजी विद्यार्थ्यांनी मग प्राचार्य, प्राध्यापकांपासून ते आपल्या शेजारी बाकावर बसणाऱ्या मित्रापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. या स्मरणरंजनात सारे गुंतून गेले आणि मैत्रीच्या नात्याचे बंध अधिकाधिक घट्ट होत गेले. आपले मित्र कुणी नगरसेवक झालेले, कुणी थेट पोलीस खात्यात अधीक्षकांपर्यंत झेप घेतलेली, तर कुणी थेट न्यायाधीशाच्या खुर्चीत बसलेले पाहून आनंदाला पारावर राहिला नाही. महाविद्यालयीन निवडणुकांमधील गमतीजमतीपासून ते अगदी प्रेम प्रकरणांवरही गप्पा रंगल्या. मैत्रीचे हे बंध असेच आणखी घट्ट करण्याच्या आणाभाका घेत प्रत्येकजण मार्गस्थ झाला. यावेळी एचपीटीचे माजी विद्यार्थी प्रसन्ना बोंडे, चंद्रकांत खोडे, कुणाल वाघ, भारत कोकाटे, विश्वजित जाधव, आशिष चौधरी, रवि सूर्यवंशी, संतोष कासार, हेमंत वैद्य, भोलानाथ वाघचौरे, संगीता फुके, महेंद्र भालेराव, संजय काळे, रवि काळे, अनिल गावंडे, अनिल देशमुख, बिपीन सोनवणे, मदन दोंदे, धनंजय वाखारे, स्वर्णिता महाले आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
हळव्या कोपऱ्यातून पाझरला आठवणींचा झरा
By admin | Published: May 30, 2016 10:21 PM