नाशिक : देशातील १४ ऑक्टोंबर १९५६ नंतरच्या बौद्धविहारांच्या निर्मितीसाठी शासनाने नाममात्र दरानेे जागा उपलब्ध करून द्यावी. बौद्ध राजा सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर शासकीय पद्धतीने साजरी करावी व जयंतीदिनी सार्वजनिक सुटी मिळावी. पाली भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी राज्यात पाली विद्यापीठ सुरू करावे, यांसह विविध ठराव बुद्धविहारांच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडण्यात आले. तसेच आगामी अधिवेशन सांगली येथे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
नाशिकात सुरू असलेल्या बुद्धविहारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाची रविवारी (दि.१४) सांगता झाली. अधिवेशनात दुसऱ्या दिवशी चर्चासत्र, खुले अधिवेशन आणि ठराव वाचन करण्यात आले.
बुद्धविहारांंचे सक्षम नेटवर्क तयार करून या माध्यमातून मोठी सामाजिक शक्ती उभी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बुद्धविहार समन्वय समीतीचे संस्थापक व मुख्य संयोजक अशोक सरस्वती बोधी यांनी सांगीतले. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘बौद्ध लेण्यांचे महत्त्व आणि संवर्धन’ विषयावर आंबेडकरी विचारवंत बबन चहांदे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. यात सागर कांबळे, प्रा. अतुल भोसेकर, डॉ. जितेंद्र कुमार यांनी बौद्ध लेण्याचे महत्त्व, इतिहास आणि संवर्धनासाठीच्या उपाययोजना याविषयी मत मांडले.
यानंतर भिख्खू विनय बोधीप्रीय यांच्या अध्यक्षतेखाली खुले अधिवेशन पार पडले. यात अभयरत्न बौद्ध, फनसुक लडाखी, नंदकिशोर साळवे, अशोक बोधी, उमेश पठारे यांनी आपले मत मांडले. बुद्ध, भीमगीत गायनाने अधिवेशनाची सांगता झाली. यावेळी संंयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप गोसावी, मुख्य आयोजक उमेश पठारे, बबन चहांदे, ॲड. प्रदीप गोसावी, कुणाल गायकवाड, किशोर शिंंदे, राजेश गांगुर्डे, श्यामकुमार मोरे, किरण गरुड, रूपाली जाधव, उल्हास फुलझेले, दिलीप रंगारी, भरत तेजाळे, मोहन अढांगळे आदींसह १५ राज्यांतील प्रतिनिधी उपस्थती होते.
---------
अधिवेशनातील महत्त्वाचे ठराव
पुरातत्व विभागाने घोषित केलेले बौद्ध अवशेष, लेणी, स्तुप, बुद्ध विहार व शिलालेख यांंचे रक्षण व्हावे. बुद्ध गया व बुद्धविहार बौद्ध बांधवांचे पवित्रस्थळ असून, त्यांच्या देखभालीसाठी बौद्ध व्यक्तीची नियुक्ती करावी. बौद्ध राजा सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर शासकीय पद्धतीनेे साजरी करावी व त्यादिवशा सार्वजनिक सुटी जाहीर करावी. १४ ऑक्टोबर १९५६ नंतर बौद्धविहारांच्या निर्मितीसाठी नाममात्र दरानेे शासनने जागा उपलब्ध करून द्यावी. अडीच हजार वर्षे जुनी असलेल्या पाली भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पाली विद्यापीठाची स्थापना करून संविधनाच्या आठव्या सूचित पाली भाषेचा समावेश करावा.