किशोर इंदोरकर । लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. उमेदवारांचा प्रचारासाठी ऐन उन्हात चांगला कस लागत आहे. मतदारांसह कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठीदेखील त्यांची लगबग सुरू आहे. शहरात नव्वद टक्के दारूबंदी झाली असल्याने कार्यकर्ते व खास मतदारांना ‘एकच प्याला’ देण्यासाठी उमेदवारांची मोठी अडचण ठरत आहे, तर अवैध दारूविक्रीवर संबंधित खात्याची करडी नजर असल्याने ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे उमेदवारांचे झाले आहे. निवडणूक आली म्हणजे साम-दाम-दंड-नीतीचा वापर होतो, तर यानंतर काही मतदार व प्रचार मोहिमेतील खास मर्जीतले व शेवटपर्यंत मतदान आपल्याला होणार या भाबड्या आशेवर उमेदवारांची रस्सीखेच सुरू आहे. त्यात भोजनावळी, ओली-सुखी पार्टीची बडदास्त ठेवण्यात येते. परंतु उच्च न्यायालयाच्या नवीन नियमावलीनुसार शहरातील वाइन शॉप, बिअरबार, परमीट रूम, हॉटेल यांना नवीन परवानगी मिळण्यास प्रश्नचिन्ह उभे आहे. ऐन निवडणूक कालावधीत शहरातील पार्टी करण्याचे जवळपास सर्वच हक्काच्या ठिकाणांवर गंडांतर आले आहे. पूर्वी कार्यकर्ते व काही जणांना खूश करण्यासाठी खास पद्धत वापरली जात होती. एका कार्यकर्त्यावर दहा-पंधरा जणांची खाण्या-पिण्याची जबाबदारी सोपवली जात होती. हा कार्यकर्ता या व्यक्तींना घेऊन शहरातील अथवा चौफुलीवर शानदार हॉटेलमध्ये मद्यांसह चमचमीत जेवण देत असे. परंतु अनेकांचे खाण्या-पिण्याचे स्वप्न भंगले आहे. सध्या काही तुरळक ठिकाणी या कार्यकर्त्यांचे हट्ट पुरवले जात आहेत. त्यामुळे जो नेहमीप्रमाणे बगीचा, पार्टीचा धडाका दिसत होता तो सध्या तरी दिसत नाही. काही उमेदवारांनी आपल्या शेतात, मळ्यात खाण्या-पिण्याची बडदास्त ठेवली असल्याचे काही प्रभागातील कार्यकर्ते सांगतात. परंतु तेथेही अत्यंत गोपनीय पद्धतीने मद्यसाठा जमा केला जातो व ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात येते. अनेक प्रभागांत मतदार व कार्यकर्त्यांना वेळेवर कोरडा शिधा वाटप होणार आहे. शहरात मद्य विक्रीच्या नवीन नियमावलीअगोदर २४ परमीट रूम, बिअरबार, २० देशी दारू दुकाने, ६ वाइन शॉप, ४ बीअर शॉपी हे सुरू होते. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शहरात या नियमात केवळ एक वाइन शॉप, चार बिअरबार, चार देशी दारू दुकाने सुरू आहेत. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य व तळीरामांची मोठी कोंडी झाली आहे. वरील ठिकाणी दररोज प्रचंड गर्दी होत आहे. येथील रस्त्यांवर वाहतूक वाढली आहे. शहरात एकमेव वाइन शॉप सध्या सुरू आहे. तेथे दिवसभर मद्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते व वाहतूक कोंडी होत आहे. बिअरबार, परमीट रूम जे सुरू आहे तेथे नेहमीची गर्दी आहे. परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांतर्फे देणाऱ्या पार्टीवर नियंत्रण आले आहे, तर एकाच वाइन शॉपवरून मोठ्या प्रमाणावर मद्य खरेदी करणे बेकायदेशीर आहे.
तळीरामांचा ‘एकच प्याला’ आला धोक्यात
By admin | Published: May 12, 2017 11:47 PM