दिंडोरी : गतवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण जरी काहीसे कमी असले तरी भाद्रपद महिन्यात पुन्हा पावसाची संततधार सुरू होऊन पाणीच पाणी झाल्याने सर्वच धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, पालखेड पाठोपाठ वाघाड, पुणेगाव धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. पुणेगाव धरणही जवळपास भरले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे .दिंडोरी तालुक्यात पावसाने जवळपास सरासरी गाठली असून, ओझरखेड व तिसगाव वगळता सर्व धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. पुणेगाव धरणही जवळपास भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग ओझरखेड धरणात सुरू असून, याही धरणाचा पाणीसाठा वाढू लागला आहे. यंदा उशिरा पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या आहे त्यातच सातत्याने पाऊस सुरू असल्याने पिकांची वाढ काहीसी खुंटली असून उत्पादन कमी होण्याचा धोका व्यक्त होत आहे. श्रावण महिन्यात ऊन-पावसाच्या पाठशिवणीचा खेळ व भाद्रपदातील कडक ऊन पिकांच्या वाढीसाठी पोषक मानले जाते; मात्र यंदा हवामानात सतत बदल होत असून, श्रावण महिन्यात वळवाच्या पावसानंतर आता पुन्हा मोसमी पाऊस सुरू होऊन वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होत आहे .
पालखेड, वाघाड ओव्हरफ्लो
By admin | Published: September 10, 2014 10:33 PM