येवला : तालुक्याच्या पूर्व भागातील वितरिका क्रमांक ४६ ते ५२ या आठमाही करण्यासाठी व चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पालखेडचे पाणी येवला तालुक्यात चांगलेच पेटले आहे. उपोषणकर्त्यांची स्थानिक प्रशासनाने साधी चौकशीही केलेली नाही. उपोषणस्थळी कोणीही शासकीय अधिकारी फिरकलेले नाहीत. दरम्यान, ७२ तास उलटल्यानंतर काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. ज्येष्ठ नागरिक भगवान भागवत (६७), तसेच भास्कर भागवत (६५) आणि संदीप लभडे (३५) यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने शहरातील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणीप्रश्नावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक आंदोलने, रास्ता रोको केलेले आहेत. कित्येक जण कुटुंबातील महिलांसह नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात जाऊन आलेले आहेत. तरीही अद्याप प्रश्न प्रलंबित असून, शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. दरम्यान, आज उपोषणस्थळी शिवसेना नेते संभाजी पवार, जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, शेतकरी संघटना नेते संतू पा. झांबरे, कुणाल दराडे यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा व्यक्त केला. जलसंपदाचे साचेबंद उत्तर पालखेड धरणसमूहाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांनी या उपोषणाबाबत नेहमीचेच साचेबंद उत्तर दिले आहे. धरणांमध्ये गाळ साठला असून, साठवण क्षमता कमी झाली आहे. मृत साठाही कमी झाला आहे. कालव्याची वहन क्षमता फक्त ३० टक्के आहे. म्हणजे एकूण पाण्याचा ७० टक्के वहनव्यय होतो. पण या वहनव्ययावर पालखेड प्रशासनाने आजवर काय केले हे मात्र सांगितले नाही. तसेच पालखेड कालवा प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या असून, पाण्याचा शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर होतो की व्यापार होतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण, उर्ध्व भागातील अनेक पाणी वापर संस्थांनी पाणी घेतलेले नाही. मग, आवर्तनाचे पाणी नेमके जाते कुठे, याचा ताळेबंद अधिकाऱ्यांनी द्यावा, अशीही मागणी आंदोलक करीत आहेत. (वार्ताहर) येवला तालुक्याच्या पूर्व भागातील वितरिका क्र मांक ४६ ते ५२ ला पालखेडच्या चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
येवल्यात पालखेडचे पाणी पेटले
By admin | Published: December 22, 2016 12:39 AM