पंचवटी : श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी गंगाघाटावर असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिर व परिसरातील अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. श्रावण सोमवारनिमित्ताने कपालेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने हजारो भाविकांनी शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. ‘हर हर महादेव, बम बम भोले’ असा जयघोष करीत दुपारी चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची पालखी मिरवणूक काढण्यात आली.दुपारी मंदिरातून महादेवाच्या चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजावट केलेल्या पालखीत पंचमुखी मुखवटा ठेवला होता. पालखी अंबिका चौक, मालवीय चौक, शनिचौक, काळाराम मंदिर, सरदारचौक, साईबाबा मंदिर रस्त्याने रामकुंडापर्यंत काढण्यात आली त्यानंतर रामकुंडावर पालखी पूजन अभिषेक करण्यात आला.कपालेश्वर मंदिरात महाआरतीने पालखी समारोप झाला. पालखी मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास मनाई करण्यात आली. कपालेश्वर मंदिरसह नारोशंकर, निळकंटेश्वर, सिद्धेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
पंचमुखी मुखवटा पालखीची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:46 AM