पंचवटी : येथील परिसरात असलेल्या ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये शुक्र वारी (दि. २७) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गुरुपूजन, होमहवन तसेच महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात सकाळी गुरु रामानंदाचार्य यांच्या प्रतिमेचे मंदिराचे महंत भक्तिचरणदास यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर चरण पादुका पूजन व अभिषेक पूजन तसेच हवन कार्यक्र म झाला. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुपूजनाने प्रेरणा मिळते, गुरुंप्रती श्रद्धा म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे पूजन करण्याची प्रथा आहे म्हणून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जात असल्याचे भक्तिचरणदास यांनी सांगितले. तपोवनातील श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम झाले. संतोषगिरी, जयरामगिरी यांच्या हस्ते गुरुपादुकांना व बाबाजी मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला. मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माधवगिरी महाराज, संतोषगिरी, जयरामगिरी, श्रवनगरी यांच्यासह विश्वस्त व भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिरांमध्ये आकर्षक सजावटगंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर, सांडव्यावरची देवी तसेच भाजीबाजार समोरील साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. गुरु पौर्णिमेनिमित्त देवीची सजावट करण्यात येऊन मखर चढविण्यात आली होती. तर साईबाबा मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. दैनंदिन कार्यक्र मात सकाळी, दुपारी व सायंकाळी महाआरती झाली. गुरु पौर्णिमेनिमित्त साईमंदिराच्या वतीने उपस्थित भाविकांना दिवसभर महाप्रसादाचे वाटप सुरू होते.
पंचवटी परिसरात गुरु पौर्णिमा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:57 AM