नाशिक : गुटखाबंदीनंतरही पंचवटी परिसरात सर्रासपणे गुटखा मिळत आहे. पानटपरी, चहाचे गाडे, तसेच किराणा दुकानांमधून गुटखाविक्री सुरू आहे. शहरातील किराणा दुकान ते पानटपरीवर सर्रासपणे गुटख्याच्या पुड्यांची राजरोसपणे विक्री होत असल्याचे दिसून येते. शहरात सर्रासपणे विक्री केल्या जाणाऱ्या गुटख्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला थांगपत्ता लागत नसल्याने या विभागाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. शासनाने गुटखाबंदी केल्यानंतर गुटखा जप्तीची कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर पथकाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने शहरात राजरोसपणे गुटख्याची विक्री केली जात आहे. बंदी घातल्याने गुटखाविक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून पथक नेमले गेल्याचे बोलले जात होते; मात्र तरीदेखील या पथकाच्या हाती गुटखाविक्री करणारे दुकानदार व पानटपरीचालक लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील दुकानांत सर्रासपणे गुटखाविक्री सुरू असून, त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
पंचवटी परिसरात सर्रासपणे गुटखाविक्री सुरू
By admin | Published: February 17, 2015 1:35 AM