नाशिक : नाशिकरोड स्थानकावर सकाळी ७.१० वाजता पोहचणारी पंचवटी एक्स्प्रेस तब्बल एक तास उशिरा आल्याने संतप्त प्रवाशांनी दोनदा चेन पुलिंग केले. त्यामुळे अगोदरच विलंब झालेल्या गाडीला आणखीनच विलंब झाला. गाडीत गर्दी झाल्याने पासधारक आणि नियमित प्रवाशांना बसण्याला जागा नसल्यामुळे संतप्त प्रवाशांनी चेन पुलिंग केल्याचे बोलले जात आहे. नाशिककरांसाठी संपूर्ण २१ नव्या डब्यांची पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांचा प्रवास सुखकर करील अशी अपेक्षा नाशिककर प्रवाशांना आहे. इंजिनसह नवीन गाडीचा वेग वाढविण्यात येऊन भविष्यात नाशिक-मुंबई अंतर आणखी कमी होऊ शकते असेही बोलले जाते; मात्र पंचवटी एक्स्प्रेसचे नियोजित वेळापत्रक न पाळण्याची परंपरा अजूनही सुरूच असून, पाच-दहा मिनिटे गाडीला विलंब होत आहे. सोमवारी (दि. ४) गाडीला तर तब्बल एक तास विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे नाशिकरोड ते देवळाली कॅम्प स्थानकादरम्यान दोन वेळेला प्रवाशांची चेन पुलिंग करीत गाडी रोखून धरली. मनमाड येथूनच गाडीला विलंब झाल्यामुळे मनमाड आणि नाशिकरोड स्थानकातून नियमित प्रवाशांव्यतिरिक्तही अन्य प्रवासी मुंबईला जाण्यासाठी गाडीत बसल्याने गाडीत गर्दी झाली. त्यामुळे नियमित प्रवास करणारे प्रवासी आणि पासधारक प्रवाशांना बसण्यासाठीदेखील जागा न मिळाल्याने दोनदा चेन पुलिंग करण्यात आले. त्यामुळे अगोदरच विलंब झालेल्या गाडीला आणखी विलंब होऊ लागल्याने काही प्रवाशांनी हस्तक्षेप करून गाडी सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रवाशांना समज दिली. दरम्यान, नवीन पंचवटी एक्स्प्रेसच्या आरामदायी सीट्स आणि बायोटॉयलेटबाबत प्रवाशांनी तक्रारीचा सूर लावल्याने अगोदरच पंचवटी गाडीच्या दुरुस्तीचा प्रश्न चर्चिला जात असताना, आता गाडीला विलंब होत असल्याची तक्रार येत असल्याने पंचवटी एक्स्प्रेसचे पुराण काही संपत नसल्याचे चित्र आहे.
पंचवटी विलंबाने धावल्याने ‘चेन पुलिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:05 AM