पंचवटी : येथील हनुमानवाडी परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी हवेत गोळीबार केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच या परिसरात एका युवकाची खून केल्याची घटना घडली होती़ यानंतर रविवारी रात्री संशियतांनी गोळीबार केल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकाम व्यवसायिक अवधूत मधुकर गायकवाड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते आपल्या विठ्ठल पार्क या सोसायटीतील घरात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी सोसायटीबाहेरील रस्त्यावर उभे राहून पिस्तुलातून हवेत गोळीबार केला व फरार झाले़ या घटनेची त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली़ दरम्यान, हनुमानवाडीत गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक विजय झोनवाल आदिंसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पिस्तुलातून झाडलेल्या गोळीची पुंगळी शोधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, पोलिसांना काही न सापडल्याने गोळीबार झाला की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ असे असले तरी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
पंचवटीत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 11:28 PM