नाशिक : हिरावाडी परिसरातील गुंजाळ मळ्यात असलेल्या मंडप, केटरर्स गुदाम व पाणी प्लॅन्टला मंगळवारी (दि.१७) दुपारी दोन वाजेच्या सुमाराला भीषण आग लागली. या आगीत मंडप गुदामातील भांडी, कपडे व अन्य साहित्य जळून खाक झाले. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग विझविली. आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.याबाबत अधिक माहिती अशी, हिरावाडीतील गुंजाळ मळ्यात वृंदावन कॉलनीजवळ अमोल पोद्दार यांचे मंडपाचे, तर प्रवीण शिरोडे यांचे केअटर्स गुदाम व गौरव पाटील यांचा पाण्याचा प्लॅन्ट आहे. मंगळवारी दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ नगरसेवक पूनम मोगरे, प्रियंका माने यांना फोन करून घटनेचे वृत्त कळवताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून काही वेळेतच आग आटोक्यात आणली. सदर आग कशामुळे लागली याचे कारण गुलदस्त्यात असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती. लीडिंग फायरमन कैलास हिंगमिरे, फायरमन एस. बी. निकम, पी. पी. बोरसे, यू. जी. दाते, ज्ञानेश्वर पाटील, विजय पाटील, विजय नागपुरे आदी कर्मचाऱ्यांनी चार ते पाच बंब पाण्याचा फवारा करून आग नियंत्रणात आणली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पंचवटीतील मंडप गुदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 6:57 PM
काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून काही वेळेतच आग आटोक्यात आणली. सदर आग कशामुळे लागली याचे कारण गुलदस्त्यात
ठळक मुद्देअग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज