नाशिक : शहरासह पंचवटी परिसरात आॅनलाइन रौलेटवर पैसे लावून जुगार खेळणारे तसेच खेळविणाऱ्या पाच संशयितांना पंचवटी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे़ राजू परदेशी, नरेश गांधी, किशन राजपूत, जस्सी रवींद्रसिंग, मयूर भालेराव अशी या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून रौलेट जुगाराचे साहित्य, मोबाइल व रोख रक्कम असा सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना काही युवक मोबाइलच्या माध्यमातून रोख रक्कम ट्रान्सफर करून रौलेट नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पंचवटीतील कुमावतनगर व शालिमारजवळील एका गाळ्यात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, कैलास वाघ, पोलीस हवालदार विलास बस्ते, दशरथ निंबाळकर, मोतीराम चव्हाण, सचिन म्हसदे, जितू जाधव, सतीश वसावे आदींनी रौलेट सुरू असलेल्या ठिकाणी सोमवारी (दि.७) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला़
पोलिसांनी पाठविलेल्या बनावट गिºहाईकाने मोबाइलवर रौलेट गेम खेळण्यासाठी रिचार्ज करण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांना इशारा करताच पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले़ त्याची कसून चौकशी केली असता त्याने मखमलाबाद रोडवरील अष्टविनायकनगर येथील राजू आकाश परदेशी, नरेश अतुल गांधी (रा. जुनी तांबट लेन), किसन राजू कुमावत (नाशिकरोड), जस्सी रवींद्रसिंग (उपनगर) व मयूर राजेंद्र भालेराव (तिवंधा चौक) या संशयितांची नावे सांगितली़ त्यानुसार पंचवटी पोलिसांनी या पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी व मोबाइलची तपासणी केली़
पंचवटी पोलिसांनी या पाचही संशयितांच्या मोबाइलची तपासणी व चौकशी केली असता आॅनलाइन फंड ट्रान्सफर करून ते आॅनलाइन जुगार खेळत व खेळवित असल्याचे समोर आले़ या संशयितांकडून व्हिडीओ रेकॉर्डर, पैसे मोजण्याची यंत्र, मोबाइल फोन तसेच एक लाख सात हजार रुपयांची रोकड असा सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़