पंचवटी : फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासाकरिता गणेशवाडीच्या शेरीमळा येथे कारवाईसाठी पोहचलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.२७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पोलीस वाहनाच्या काचा फूटल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक विवेक बैरागी यांच्याकडे एका फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास होता. या गुन्ह्याबाबत कारवाई करण्यासाठी बैरागी हे पथकासह शेरीमळ्यात पोहचले होते. यावेळी काही महिला व तरुणांनी पोलीस पथकावर दगडफेक करत हल्ला चढविला. यावेळी संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. याबाबत बैरागी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. तपासासाठी रविवारी बैरागी हे पोलिस कर्मचारी बागडे, पळशीकर व कुटे यांच्यासमवेत पोलीस वाहन क्र मांक (एम.एच१५ ई.ई २४८) गणेशवाडीतील शेरीमळ्यात दुपारी गेले होते. तेथे चौकशी सुरू असताना जमलेल्या जमावापैकी संशियत पुंडलिक गोविंद उशीर, संदीप मधुकर पगारे, गुलाब तरळ, मोहन उशीर, संजय पाटील, गौरव उशीर, सुनील सोळसे, गुलाबबाई चव्हाण, बेबी गरड व अन्य संशियतांनी गर्दी केली. त्याचवेळी मोहन उशीर याने पोलीसांवर दगडफेक करून पोलीस वाहनाची काच फोडली नंतर संजय पाटील याने बैरागी व कर्नावट यांना हाताला मारहाण करून अंगावर काचकुयरी फेकून जीवे मारण्याची धमकी दिली. काचकुयरीचा शरीराला स्पर्श झाल्यामुळे पोलिसांना अंगाला खाज सुटली होती.परिसरात मोठा जमाव जमल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती कळविण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, अशोक भगत यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला यावेळी पोलिसांनी पुंडलिक उशीर, संदीप पगारे, गौरव उशीर, सुनील सोळसे या चौघा संशियतांना ताब्यात घेतले आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पंचवटी : कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 6:26 PM
काही महिला व तरुणांनी पोलीस पथकावर दगडफेक करत हल्ला चढविला. यावेळी संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्नही केला.
ठळक मुद्देअंगावर काचकुयरी फेकून जीवे मारण्याची धमकीकाचकुयरीचा शरीराला स्पर्श झाल्यामुळे पोलिसांना अंगाला खाज सुटली