नाशिक : महापालिकेच्या पंचवटी विभागातील फुलेनगर येथील मेरीच्या कार्यालयाजवळ असलेली भूमिगत जलवाहिनी अचानकपणे फुटल्याने पाण्याचा कारंजा सोमवारी (दि.१६) दुपारी अधिकच उंच उडत होता. यावेळी मनपाच्या संबंधित ठेकेदाराच्या कामगारांनी जेसीबीसह या ठिकाणी हजेरी तर लावली; मात्र जलवाहिनीची दुरूस्ती न करता केवळ पाण्याचा कारंजा बंद व्हावा, यासाठी जेसीबीने मातीचा भराव त्यावर टाकून काढता पाय घेतला.महापालिका प्रशासनाला जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच याठिकाणी जेसीबीसह कामगार हजर झाल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही दिलासा मिळाला की जलवाहिनीची आता तत्काळ दुरूस्ती होईल आणि पाण्याचा अपव्यय थांबेल; मात्र कामगारांनी जेसीबीद्वारे केवळ उडणारा कारंजा मातीच्या भरावाने दाबला परंतू वाया जाणारे पिण्याचे शेकडो लिटर पाणी त्यांना रोखता आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
फुलेनगर झोपडपट्टीच्या अगदी जवळच जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे परिसरातील महिलावर्गाने धुणीभांडी तसेच रिक्षाचालकांनी रिक्षा व दुचाकीदेखील या कारंजाखाली स्वच्छ करून घेतल्या तर बाळगोपाळांनी कारंजाचे तुषार अंगावर झेलत ओलेचिंब होऊन नाचण्याचा मनमुराद आनंदही लुटला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र याकडे कानाडोळा करणे पसंत केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीची दुरूस्तीचे काम हाती का घेण्यात आले नाही? असा प्रश्न यावेळी नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.