नाशिक : पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या विजया विलास कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात येऊन पंचायत समितीवर राष्टÑवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. उपसभापतिपदी पक्षाचेच ढवळू गोपाळ फसाळेयांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.नाशिक पंचायत समितीचे सभापतिपद यंदा ओबीसी महिला राखीव असल्याने सुरुवातीपासूनच विजया कांडेकर यांच्या नावाची चर्चा होती. पंचायत समितीत राष्टÑवादीचेच वर्चस्व असून, आठपैकी पाच सदस्य राष्टÑवादीचे तर एक सहयोगी अपक्ष आहे व दोन सदस्य शिवसेनेचे आहेत. विजया कांडेकर यांच्याबरोबरच उज्ज्वला शिवाजी जाधव यांनीदेखील पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना थांबविण्यात आले व उर्वरित दोन वर्षांत पक्षातील प्रत्येकालाच सभापती, उपसभापतिपद वाटून देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी तहसीलदार अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सभापतिपदासाठी विजया कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, तर उपसभापतिपदाच्या निवडणुकीत ढवळू फसाळे यांचाच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी आमदार हिरामण खोसकर, सरोज आहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, कोंडाजी मामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, अपर्णा खोसकर, संदीप गुळवे, रत्नाकर चुंभळे, संपत सकाळे, निवृत्ती महाराज कापसे, राजाराम धनवटे, रमेश औटे, छाया डंबाळे, कविता बेंडकोळी, अनिल जगताप, निवृत्ती कांडेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंचायत समिती सभापतिपदी राष्टÑवादीच्या कांडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 1:52 AM