सुनील शिंदे घोटीतालुक्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या पंचायत समितीच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीने निवडणुकीचे बिगुल वाजले. संभाव्य आरक्षण काय राहणार, अनुसूचित जाती-जमातीला कोणता गण, महिलांसाठी कोणता गण आरक्षित राहणार यासाठी काही महिन्यांपासून करण्यात येणाऱ्या गणितांना अखेर आज पूर्णविराम मिळाला. दरम्यान, आरक्षण सोडतीपूर्वीच कोणता गण कोणासाठी आरक्षित होणार याची कल्पना राजकीय जाणकारांना असल्याने आजच्या सोडतीकडे अनेक प्रतिष्ठित राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसून आले. एकंदरीत आजची आरक्षण सोडत काहीशी आशादायक ठरली आहे.इगतपुरी तालुक्यात पंचायत समितीचे एकूण दहा गण असून, हा तालुका आदिवासीबहुल असल्याने चार जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येतात, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीन, सर्वसाधारणकरिता दोन तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक अशा दहा जागेची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला प्रत्येकी तीन, मनसेला दोन, शिवसेनेला एक, तर अपक्षाने एका जागेवर बाजी मारली होती. मात्र आजच्या आरक्षण सोडतीत महत्त्वपूर्ण फेरबदल झाल्याने अनेक पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. काहींना शांत राहण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. काहींना मात्र जिल्हा परिषद गटात उभे राहण्याची संधी निर्माण झाली आहे.घोटी गण प्रथमच आरक्षितअनेक वर्षांपासून अनुसूचित जाती आरक्षणाच्या प्रतीक्षेत असणारा घोटी गण अखेर आज अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने सोडतीनंतर उत्साह जाणवला. या गणात इच्छुकांची गर्दी होणार असली तरी दलित संघटना आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाही प्रबळ उमेदवारांच्या शोधात असणार आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राजकीय गणितं आखण्यास प्रारंभ
By admin | Published: October 16, 2016 10:19 PM