स्थापनेनंतर नाशिकमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळालेल्या मनसेला नाशिक महापालिकेत सत्तारूढ होण्याची संधी मिळाली. त्यावेळी मनसेत असलेले हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ यांना काट्याची टक्कर दिली होती. दरम्यान, राजकीय समीकरणे बदलत असताना आता मनसे अत्यंत शांत झाली आहे. महापालिका म्हणजे शहराच्या कारभाराचे केंद्र असून, तेथील अनेक विषयांबाबत आंदाेलने करण्याची गरज असताना नेते शांत बसून आहेत. महापालिकेत सत्ता असताना मनसेचे चाळीस नगरसेवक होते. त्यानंतर पक्षाचे नगरसेवक अन्य पक्षांत गेले. तेथून किमान बारा ते तेरा माजी नगरसेवक पुन्हा पक्षात येण्यास उत्सुक आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि अनास्था यामुळे ते कुंपणावर आहेत. पक्षाने पुन्हा पहिल्यासारखे धडक उपक्रम राबवले तर गतवैभव प्राप्त होईलच, परंतु येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकेल असे मतही या युवा कार्यकर्त्यांंनी पक्षाकडे मांडल्याचे वृत्त आहे.
इन्फो...
राज यांच्याकडून अपेक्षा
नाशिकमधील प्रस्थापित नेत्यांना टाळून राजगड गाठणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची तळमळ राज ठाकरे यांनी समजावून घेतली आणि सुमारे अर्धा तास मोकळी चर्चा केली. युवकांचा उत्साह बघून राज यांनी त्यांना कामाला लागा, मी नाशिकला जानेवारीत महिन्यात येईल, असे सांगितल्याने राज ठाकरे नक्कीच भावनांची दखल घेतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.