नाशिक : मंगळवारी झालेला मुसळधार पाऊस आणि गोदावरीला आलेला महापूर यामुळे शहरात ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे शुक्रवारपासून (दि.५) करण्यात येणार असून, त्यासाठी दहा पथकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.शहरातही ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार वाहून गेले आहेत, तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसून मौल्यवान साहित्यांबरोबरच महत्त्वाच्या दस्तावेजांनाही झळ पोहोचली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरी भागातीलही नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी दहा पथकांची नेमणूक केली आहे. सदर पथकात तलाठ्यांसह नाशिक महापालिकेचे दोन अभियंते यांचा सहभाग असणार आहे. सहाही विभागीय अधिकाऱ्यांनी शहरातील बाधित झालेल्या सुमारे २० ठिकाणांची यादी तयार केली असून, शुक्रवारपासून पंचनामे करण्यास प्रारंभ होणार आहे. (प्रतिनिधी)
शहरातील नुकसानीचे उद्यापासून पंचनामे
By admin | Published: August 05, 2016 1:56 AM