पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तीर्थव्रत।।या न्यायाप्रमाणे बालपणी आमचे मामा वै. कचेश्वर महाराज वडगुले मांडवडकर यांनी आळंदी सिद्धबेटात वै. गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांच्याकडे वारकरी शिक्षणासाठी योग आला. त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील आनंद व वारीची ओढ मनात घर करून बसली. मग काही वर्ष संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अनुभवता आला. मागील वर्षी संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात व याअगोदरही १२ वर्ष वारीचा अविस्मरणीय अनुभव जवळून घेतला. वारकरी संप्रदायाने दिंडी वारी, यात्रा अशा सामूहिक उपासनेवर प्रतिज्ञाबद्ध होऊन कटाक्षाने भर दिलेला आहे. त्यामागे व्यक्ती-समाज-धर्म यातील परस्पर संबंधाचा विपूल मानस शास्त्रीय आशय असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता दिसून येते. समाजाची परिवर्तनशीलता व धर्माची गतिमानता या विषयीचे साक्षेपी अवलोकन करण्याची दुर्मिळ संधी अशा सामूहिक दिंडी सोहळ्यातून व पंढरीच्या वारीतून मिळते. प्रपंचात व्यवस्था असते पण वारीमध्ये सुखानुभूतीची अवस्था प्राप्त होते म्हणून पंढरीची वारीची ओढ असते. वारीमध्ये प्रेम, त्याग, सेवा, विश्वबंधुत्व अशा थोर सद्गुणांची शिकवण व जोपासना घडविण्याचे सामर्थ्य पंढरीच्या वारीत आहे, यामुळे दिवसेंदिवस वारीची अभिवृद्धी होताना दिसते, कारण वारी नुसती प्रथा नाही तर ती संत परंपरा आहे. वारीमध्ये सद्गुणाचे शिक्षण, शिकवण व संस्कार आपोआप होतात. ही भक्तीप्रेमाची ऊर्जा पुढील वारीपर्यंत टिकते. नामस्मरणाची गोडी वारीतच वाढते. ज्ञान, प्रेम, भक्तीने माणसं वारीतच जोडायची असतात, याकरिता प्रत्येकाने एकदा तरी पंढरीची वारी करावी.पंढरीची वारी चार प्रकारची आहे. सकाम वारी- मायिक फलप्राप्तीसाठी, विधीची वारी- वाडवडिलांच्या आज्ञापालनार्थ, निष्कामवारी- मोक्षासाठी, आवडीची वारी- जीवनमुक्तीचे विलक्षण सुख प्राप्तीकरिता आहे.आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक हे तीन ताप अंत:करणाला सोडूनगेल्यावरच सुख-शांती लाभते, तसे काम, क्र ोध, लोभ हे तीन विकार नष्ट झाल्यावरच मोक्ष मिळतो. हे सर्व संतांची संगत, नामस्मरण, भजन, कीर्तन, पायी दिंडी, तीर्थस्नान, देवाचे दर्शनाने घडते.‘संत संगे चालता दिंडी ।पाप कर्मा पडे खिंडी ।।पंढरीचे वारकरी ।ते अधिकारी मोक्षाचे ।।’अण्णासाहेब महाराज आहेर(जिल्हाध्यक्ष- अखिल भारतीयवारकरी मंडळ, नाशिक)
पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:10 AM