लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : पाथर्डी पंचक्रोशीतील धर्मराज संस्थेच्या वतीने श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी पांडवलेणीच्या पायथ्याशी भरविणारी यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द झाल्याने यंदा नागरिकांचा हिरमोड झाला. तथापि, रूढी-परंपरेप्रमाणे पांडवलेणी येथील हनुमान मूर्तीचे पूजन व प्रातिनिधिक स्वरूपात कुस्ती लावण्यात आली.सकाळी नगरसेवक भगवान दोंदे, सुदाम डेमसे, माजी नगरसेवक संजय नवले, सोमनाथ बोराडे, शरद डेमसे यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. पाथर्डी येथील धर्मराज पंचकमिटीची इंदिरानगर पोलीस ठाण्यात बैठक होऊन त्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेली तिसºया श्रावणी सोमवारी भरणारा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी हनुमानाची विधिवत पूजा करण्यात आली. दरवर्षी पांडवलेणीच्या पायथ्याशी भरणाºया यात्रेमध्ये भेळ, पाणीपुरी ,गोडीशेव, रेवडी, फापडा यासह विविध खाद्यपदार्थांचे आणि विविध खेळण्यांची दुकाने लागत. यंदा मात्र उत्सव रद्द करण्यात आल्याने यात्रास्थळी शुकशुकाट होता. फक्त परंपरेनुसार प्रातिनिधिक स्वरूपात अशोक कोंबडे व रामदास गवळी या पहिलवानांची कुस्ती लावण्यात आली. यावेळी पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, तानाजी गवळी, विष्णू डेमसे, सचिन सोनवणे, पांडुरंग शिरसाठ आदी उपस्थित होते.