त्र्यंबकेश्वर : येथील निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या अध्यक्षपदी विश्वस्त मंडळातील पालखीप्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे व सचिवपदी जिजाबाई मधुकर लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.समाधी संस्थानच्या सोमवारी झालेल्या बैठकीत वादळी चर्चेनंतर सर्वानुमते एका विशिष्ट मुदतीवर ही नियुक्ती झाल्याचे विश्वस्त मंडळातर्फे सांगण्यात आले. यावेळी संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पंढरपूरवारीसाठी पालखी सोहळाप्रमुख म्हणून आतापर्यंत सहायक पालखी सोहळाप्रमुख म्हणून काम पाहणारे पुंडलिक थेटे यांची पालखी सोहळाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.संत निवृत्तिनाथ समाधी विश्वस्त मंडळाची नियुक्ती नाशिक धर्मादाय आयुक्तांनी २० जून २०१५ रोजी केली आली. पहिल्या अध्यक्षपदाचा मान त्र्यंबकराव गायकवाड यांना मिळाला होता. त्यानंतर १७ जानेवारी २०१७ रोजी गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज धोंडगे यांची निवड करण्यात आली होती. त्यांची मुदत संपल्यानंतरदेखील तब्बल सव्वा दोन वर्षांनी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एका विशिष्ट मुदतीसाठी पंडितराव कोल्हे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.दरम्यान या विशेष बैठकीसाठी मावळते अध्यक्ष संजय धोंडगे, पवन भुतडा, त्र्यंबकराव गायकवाड, रामभाऊ मुळाणे, पुंडलिकराव थेटे, जयंत गोसावी, जिजाबाई लांडे, ललिता शिंदे, धनश्री हरदास, योगेश गोसावी, अविनाश गोसावी आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष व सचिवपदाची निवड झाल्यानंतर यावेळी सर्वप्रथम मावळते अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष व सचिवांसह त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिकराव थेटे यांचा सत्कार करण्यात आला.
निवृत्तिनाथ समाधी संस्थान अध्यक्षपदी पंडित कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 1:40 AM