नाशिक : शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात ख्यातनाम गायक पंडित व्यंकटेश कुमार यांनी सादर केलेल्या पुरिया धनश्री रागातील गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रख्यात गायक रमाकांत गायकवाड यांच्यासह वीनावादक उत्साद बहाउद्दीन डागर यांच्या संगीताचाही नाशिककरांनी अस्वाद घेतला.डॉ. कुर्तकोटी सभागृहात शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागाच्या दोन दिवसीय कुर्तकोटी संगीत महोत्सवाचा रविवारी (दि.१८ ) समारोप झाला. दुसºया दिवशी सकाळच्या सत्रात रमाकांत गायकवाड यांच्या हरहुन्नरी गायनाने रसिकांची मने जिंकली. किराना आणि पतियाळा अशा दोन दमदार घराण्यांची गायकी आत्मसात केलेल्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनात श्रोत्यांना भावपूर्ण स्वरलगाव आणि जोरकस लयकारीचा सुंदर मिलाफ ऐकायला मिळाला. त्यांनी राग तोडी ने मैफिलीची सुरूवात करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. त्यानंतर पारंपरिक बंदिश ‘याद पियाकी आये’ सादर केली. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबळेकर यांनी तर हार्मोनियमवर सुभाष दसककर यांनी साथसंगत केली. प्रख्यात रुद्र वीणा वादक उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी राग किरवानी व शुद्ध सारंग सादर करताना श्रोत्यांची मने जिंकली. त्यांना पखवाजासह ज्ञानेश्वर देशमुख यांनी साथसंगत केली.अखेरच्या सत्रात सायंकाळी ग्वाल्हेर, किराणा आणि पतियाळा तिन्ही घराण्यांच्या मिश्र गायकीसाठी ख्यातकिर्त असलेल्या शास्त्रीय गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या पुरिया धनश्री रागातील ‘अब तो ऋतु मान’ या बडा ख्यालाच्या विलंबित एकतालातील पारंपरिक बंदीशीसह तीन तालातील जोड पायलिया झनकारचे सादरीकरण रसिकांना भावले. त्यानंतर राग केदार व मिश्र खमाजमधील ठुमरी आणि राग दुर्गामधील ‘सखी मोरी रुमझूम’ ही पारंपरिक बंदीश सादर करताना तराण्याची जोड रसिकांची वाहवा मिळविणारी होती. अंतिम टप्प्यात कानडी भजन सादर करताना राग भैरवीने त्यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर केशव जोशी व तबल्यावर सतीश कोळी यांनी संगीतसाथ केली. सूत्रसंचालन यास्मिन दांडेकर यांनी केले.
पंडित व्यंकटेश कुमार यांची मैफल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 1:38 AM
शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात ख्यातनाम गायक पंडित व्यंकटेश कुमार यांनी सादर केलेल्या पुरिया धनश्री रागातील गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रख्यात गायक रमाकांत गायकवाड यांच्यासह वीनावादक उत्साद बहाउद्दीन डागर यांच्या संगीताचाही नाशिककरांनी अस्वाद घेतला.
ठळक मुद्देसंगीत महोत्सवाचा समारोप : गायकवाड यांच्या गायनाचाही आस्वाद