वडनेर भैरव : आज पावलागणिक फसवणूक होत असताना आणि संशयाने भरलेल्या वातावरणात प्रामाणिकपणाचे दर्शन घडले की, माणसातला माणूस जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. अशीच प्रामाणिकपणाची घटना घडली आहे. धोडांबे येथील पुरोहित पांडुरंग दीक्षित यांनी रस्त्यावर सापडलेले कांदा उत्पादक शेतकऱ्याचे ६७ हजार रुपये परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देवळा परिसरातील अनेक शेतकरी पिंपळगाव बसवंत येथे ट्रॅक्टरच्यासाह्याने कांदा विक्रीसाठी नेत असतात. देवळा तालुक्यातील एक कांदा उत्पादक शेतकरी आपले कांदे विकून कांचन बारी मार्गे घरी जात असतानाच त्यांच्या खिशातून पावतीसह ६७ हजार रुपये हे नकळत धोडंबा फाटा ते कांचन बरी रस्त्यावर पडले. सदर पैसे पुरोहित पांडुरंग दीक्षित यांना सापडले. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने शेतकरी हरी जाधव व योगेश पवार यांचा शोध घेऊन त्यांना त्यांचे पैसे प्रामाणिकपणे परत केले. आपल्या घामाचा आणि कष्टाचा पैसा प्रामाणिक पणे परत केल्याबद्दल दीक्षितांच्या माध्यमातून पांडुरंगच मदतीला धावल्याची भावना या शेतकऱ्यांची झाली आणि त्यांनी दीक्षित गुरुजींचे मनोमन आभार मानले. कोटेश्वरी पतसंस्थेचे डॉ. नितीन शाहीर यांनी पांडुरंग दीक्षित यांचा हॉस्पिटल मध्ये बोलावून सन्मान केला.
अन् शेतकऱ्यांच्या मदतीला पांडुरंग धावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 3:28 PM