अझहर शेख, नाशिक : राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या नाशिकमधील पुरातन पांडवलेणी उजळणार आहे. पुरातत्व विभागाने पांडवलेणीची पडझड रोखण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याने काळे पडलेले दगड रासायानिक प्रक्रियेद्वारे मुळ रंगात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे.इ.स.१२००च्या दरम्यान या लेणी खोदल्या गेल्या असाव्यात. या बौध्द लेणी असून ‘त्रिरश्मी’ नावानेही पांडवलेणी ओळखली जाते. भारतीय पुरातत्व विभागाने पांडवलेणी अशी नोंद केलेली असून या लेणीचा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढचे पाऊल उचलले आहे. डोंगरामध्ये कोरलेल्या या लेणींची अवस्था काळानुरूप जीर्ण झाली असून काही लेणींमधील दगड धोकादायक स्थितीत पोहचले आहेत. तसेच लेणीचे सौंदर्यदेखील कमी झाले आहे. त्यामुळे दुरवस्था रोखण्याची मागणी जोर धरू लागली होती. पुरातत्व विभागाने या लेणीच्या झळाली व दुरूस्तीचा स्वतंत्र प्रस्ताव तयार केला असून दिवाळीनंतर प्रत्यक्षरित्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती संरक्षण सहायक हर्षद सुतारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नाशिक शहरातील पांडवलेणी १९९६ साली केंद्रीय पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली. त्यानंतर काही प्रमाणात लेणीच्या परिसरात सोयीसुविधा पर्यटकांच्या दृष्टीने उपलब्धदेखील झाल्या. लेणीपर्यंत जाण्याची वाट सुरक्षित व सुखकर करण्यात आली; मात्र लेणीच्या प्रत्यक्ष कामाबाबत पुरातत्व विभागाने अद्याप विचार केलेला नव्हता. लेणीची वाढती दुरवस्था रोखणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच प्रथमच स्वतंत्र आराखडा आखण्यात आला असून तज्ज्ञांच्या मदतीने लेणीचे सौंदर्य व आयुर्मान वाढविण्याचा प्रयत्न दिवाळीनंतर केला जाणार आहे.
नाशिकमधील पांडवलेणीच्या सौंदर्याला रासायनिक प्रक्रियेतून मिळणार झळाळी
By अझहर शेख | Published: October 13, 2018 3:40 PM
अझहर शेख, नाशिक : राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या नाशिकमधील ...
ठळक मुद्देपांडवलेणी १९९६ साली संरक्षित स्मारक म्हणून घोषित ‘त्रिरश्मी’ नावानेही पांडवलेणी ओळखली जाते.