नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने कार्यकारी मंडळाच्या आठ पैकी सात जागांवर विजय मिळविला. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. यापूर्वीच संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. कार्यकारी मंडळाच्या उर्वरीत जागांसाठी सागरमल मोदी शाळेत सकाळी मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर रात्री ९ वाजता निकाल घोषित करण्यात आला. त्यानुसार उपाध्यक्षपदी प्राध्यापक दिलीप फडके हे ४०२ मतांनी तर चंद्रशेखर मोंढे ३७९ मतांनी विजयी झाले. अपक्ष निवडणूक लढविणारे कृष्णा शिरुडे यांना १२७ मतांवर समाधान मानावे लागले. विद्यमान कार्यवाह शशांक मदाने यांनी २९९ मते मिळवून विजयाची हॅट्ट्रीक केली. शिक्षक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र निकम प्राथमिक मुख्याध्यापक संघात बिनविरोध निवडून आले. रहाळकर यांच्या पॅनलमधील पांडुरंग अकोलकर (२१८), यशवंत जोशी (१८२), सरोजीनी तारापूरकर (१५९), विनायक देशपांडे (१७६), विश्वास बोडके (१६४), चंद्रशेखर वाड (२४०), श्रीरंग वैशंपायन (१५६) निवडून आले तर अपक्षांपैकी दत्ता नागपुरे यांनी विजय मिळविला. कार्यवाहपदाच्या एका जागेसाठी विद्यमान कार्यवाह शशांक मदाने, सुनील सबनीस, सुनीता मोगल रिंगणात होते. यात मदाने यांनी विजय मिळविला. संस्थेच्या सीडीओ मेरी शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी पदाच्या एका जागेवर विद्यमान सहकार्यवाह दिलीप अहिरे यांनी पंढरीनाथ बिरारी यांचा पराभव करून विजय मिळविला. तर डी. एस. कोठारी शाळेच्या शिक्षक प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीत सुनीता मोगल यांनी नगरसेवक शोभा शिंदे यांचा पराभव केला. माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक संघातून रत्नप्रभा सूर्यवंशी, लतीका पाटील व यादव आगळे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमुख्याध्यापक संघातून आशा डावरे, एकनाथ कडाळे, गीता कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकेतर प्रतिनिधी पदाच्या निवडणुकीत सीडीओ मेरी शाळेतील लेखनिक अरुण जाधव विजयी झाले त्यांनी साहेबराव पवार यांचा पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माधवराव भनगे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने कार्यकारी मंडळाच्या आठ पैकी सात जागांवर विजय
By admin | Published: February 02, 2015 1:30 AM