नाशिक (सुयोग जोशी) : झारखंडमध्ये काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात कपाटांमध्ये दोनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड मिळाली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोिहतमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे. भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलतांना उपाध्ये म्हणाले, झारखंडमध्ये काँग्रेसच्या एका संसद सदस्याच्या घरात एवढी मोठी रक्कम सापडली तर या हिशेबाने काँग्रेसच्या इतर अन्य नेत्यांच्या घरी आणि गांधी कुटूंबाकडे किती संपत्ती असेल याचा हिशेब जनेतेने करावा असेही ते म्हणाले. देेशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याची गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारने आता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणूनन काढल्याखेरीज स्वस्थ बसू नये. भ्रष्टाचाराचे भांडे फुटू लागल्यामुळेचे सारे भ्रष्ट नेते इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आले असून एकएक प्रकरण बाहेर पडू लागल्यामुळे आता इडी, सीबीआय, आयीसारख्या संस्थांच्या नावाने सामूहिक रडगाणे सुरू झाले आहे. मोदी सरकारच्या गॅरंटीने काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराच्या मुळावर घाव घालण्यास सुरूवात केली असून इंडिया आघाडीतील एकामागोमाग एक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या काळ्या कारभाराचा हिशेब जनतेसमाेर द्यावाच लागणार आहे असा विश्वासही उपाध्ये यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस आमदार सीमा हिरे, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, सुनील केदार, नाना शिलेदार, पंकज मोदी, श्याम बडोदे आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.
कांदा निर्यातबंदीप्रकरणी लवकरच उपाययोजना
कांदा निर्यातबंदीप्रकरणी केंद्र सरकारकडून लवरकच योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे उपाध्ये यांनी यावेळी सांगितले. उपाध्ये म्हणाले, टिपू सुलतानचे गोडवे गाणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला कोणतीही नैतिकता शिकवू नये. त्यांच्याबाबत नैतिकता या शब्दाचा आणि राऊत यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. प्रताप सरनाईक यांना महायुतीने क्लिनचिट दिली असून त्यांच्याबाबत कारवाईसाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.