सटाणा : तालुक्यातील भडाणे व पिंपळकोठे परिसरात बिबट्याच्या जोडीने धुमाकूळ घातला असून शनिवारी (दि.१६) रात्री एका शेतमजुराच्या शेळीला फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपळकोठे व भडाणे परिसरात डाळिंब, द्राक्ष आणि ऊस आणि मक्याचे मोठ्या प्रमाणावर पीक आहे. त्यामुळे बिबट्याच्या जोडीने याच परिसरात आपले ठाण मांडले आहे. नामपूर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भामरे यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा मुक्त वावर असून शेतशिवारात रात्री पहाटे धुमाकूळ घातल्याने संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. याबाबत भामरे यांनी ताहाराबाद वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्याच्या जोडीचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र वनविभागाच्या उदासीनतेमुळे तत्काळ पिंजरा न लावल्यामुळे शनिवारी रात्रीच्या सुमारास भडाणे शिवारातील शेतमजूर प्रल्हाद सुकराम पिंपळसे यांच्या शेळ्यांवर हल्ला चढवत एका शेळीचा फडशा पाडून फस्त केली. या हल्ल्यामुळे परिसर दहशतीखाली आहे. दरम्यान, दरेगाव परिसरातील गोप्या डोंगरावर बिबट्याचे दर्शन झाले असून दोन कुत्र्यांचा त्याने फडशा पडला आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.