दिंडोरी : तालुक्यातील करंजवण येथील पिंगळे वस्तीवर बिबट्याने गेल्या पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, सकाळ, दुपार, संध्याकाळ बिबट्या भाऊसाहेब पिंगळ यांच्या वस्तीवर येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या वस्तीवरील व आजूबाजूचे सर्व लोक सतर्क असल्यामुळे व वस्तीवर ग्रामस्थ मोठ्याने आवाज करून बिबट्याला पळून लावत आहे.
यासंदर्भात वनविभागाला अनेकवेळा दूरध्वनीवरून माहिती देऊनही वनविभाग या घटनेकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार रावसाहेब पिंगळे यांनी केली आहे. सध्या या परिसरामध्ये शेतीची कामे जोरात चालू असल्यामुळे व शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही; परंतु शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे करंजवण येथील शाळा चालू झाली आहे. त्यामुळे मळ्यावस्त्यावरील लहान मुले गावात शाळेत जात आहे. मात्र बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने लखमापूर येथील माजी उपसरपंच वाल्मीक मोगल यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांवर हल्ला केला होता. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.करंजवण, ओझे, म्हैळुस्के, लखमापूर हा कादवा नदीचा परिसर असून, या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची शेती आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध आहे. कादवा नदीकाठ परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वनविभागाने या भागात पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे.करंजवण व ओझे परिसरामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून बिबट्याने कुत्रे, वासरे आशा पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत, मात्र वनविभागाला वारंवार सूचना देऊनही या बिबट्याची दखल घेतली जात नाही. त्याप्रमाणे वनविभागाचे तालुका वनअधिकारी फोन घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यांची प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे. एखादी घटना घडल्यानंतर सर्व वनविभागाचा ताफा तेथे हजर होतो, मात्र घटना घडू नये यासाठी वनविभाग कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही हे लखमापूरच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे.