संगमेश्वर : मालेगाव - मनमाड चौफुली परिसरात बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यामुळे शेतपिकांची कापणी व शेतकामे कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. काहींनी यावर फटाके फोडण्याचा उपाय योजला असला तरी तो कायमस्वरूपी व सुरक्षित असा नाही. येथील मनमाड चौफुलीपासून काही अंतरावर मनमाड रस्त्यालगत व नाशिक मार्गावर शेती व जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. या भागातच गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. परिसरातील अनेक शेतकरी व त्यांच्या सालदारांनी प्रत्यक्ष या बिबट्यास बघितले आहे. या भागात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. त्याशिवाय बाभळीची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. मका पीक व बाभळीच्या झाडांचा आसरा घेत सदर बिबट्या परिसरात वावरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या बहुसंख्य शेतांमध्ये दाट पद्धतीने असलेले मक्याचे पीक कापणीला आले आहे. मात्र परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने हे पीक कसे काढावे, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. काही जणांनी यावर फटाके फोडण्याचा उपाय शोधला आहे. शेतात जाण्याअगोदर, पीक कापणीअगोदर शेतात फटाके फोडले जातात. जेणेकरून फटाक्यांचा आवाज ऐकून सदर बिबट्या पळून जाईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज असतो. फटाके फोडल्यानंतरही दबकत दबकतच, कानोसा घेत शेतपिकात प्रवेश केला जात आहे. यासंदर्भात वनविभागाचे अधिकारी - कर्मचारी यांनी परिसराची पाहणी केली आहे. मात्र या बिबट्यास पकडण्यासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही. निष्पाप शेतकरी वा शेतमजुरांचा बळी जाण्यापूर्वी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
मनमाड परिसरात बिबट्याची दहशत
By admin | Published: October 09, 2014 10:39 PM